सोलापूर : शेतजमीन आणि ऊस तोडणीच्या वादातून तालुक्यातील आगळगाव येथे एका शेतकऱ्यावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. शशिकांत अर्जुन गुळमीरे (४२) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर बार्शीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, बार्शी तालुका पोलिस स्थानकात गुळमीरे यांचा सख्खा भाऊ, पुतण्या आणि भावजयीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या हिश्यातील ऊस तोडणी करत असताना हा प्रकार घडला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत गुळमीरे आणि त्यांचे भाऊ कुमार गुळमीरे यांच्यात गट नं. ६१३ मधील जमिनीवरून न्यायालयात दिवाणी दावे प्रलंबित आहेत. शशिकांत यांनी आपल्या हिश्श्याच्या जमीनीत ऊस लावला होता. शशिकांत हे शेतात असताना त्यांनी कुमार व इतरांना ऊस तोडणीस विरोध केला. यावेळी पाच जणांनी घटनास्थळी जाऊन शशिकांत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धिरज गुळमीरेने जवळ असलेला कोयता उचलून शशिकांत यांच्या पाठीवर डाव्या बाजूला गंभीर वार केला. हल्ल्यानंतर आरोपींनी हे शेत आमचे आहे, पुन्हा येथे दिसलात तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली आणि तोडलेला ऊस बैलगाडीत भरून घेऊन गेले. जखमी शशिकांत यांना त्यांच्या पत्नीने तातडीने बार्शी येथे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणाचा तपास अरुण डुकळे करत आहेत.


















