बीड : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या ३४ व्या ऊस गाळप हंगामाचा यशस्वी सांगता समारंभ दि.१३ मार्च, २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. १२२ दिवसांच्या ऊस गाळप हंगामात ६.७१ लाख मे.टन ऊसाचे यशस्वीरित्या गाळप करून या गाळप हंगामाची सांगता गव्हान पुजनाने करण्यात आली. तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ ऊस गाळप हंगामाचा सांगता समारंभ साखर संघाचे उपाध्यक्ष, आमदार प्रकाश सोळंके, जेष्ठ संचालक धैर्यशील सोळंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके यांच्या हस्ते गव्हाण पुजन करून करण्यात आली याप्रसंगी व्हा. चेअरमन जयसिंह सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीसह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
याप्रसंगी गाळप हंगामात ऊस तोड मजूर, ट्रॅक्टर चालक, मुकादम यानी उत्कृष्टपणे काम करत प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यांचा चेअरमन, व्हाईस चेअरमन व सचालक यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना व्हाईस चेअरमन जयसिंग सोळंके म्हणाले की, यावर्षी ऊस गाळप कमी झाले असले तरी कारखाना यंत्रणेने प्रतिदिन सहा हजार टनांपर्यंत गाळप केले आहे. हे खर- ोखरच कौतुकास्पद असुन, याचा अभिमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्याबाहेर जाऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
चेअरमन विरेंद्र सोळंके म्हणाले की, हंगामात १२२ गाळप दिवसात ६.७१ लाख मे. टन ऊसाचे गाळप करून १०.६५% सरासरी साखर उताऱ्याने ३,६२,९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या हगामात हे. सरासरी ८९ मे. टन ऊस ऊत्पादकता मिळालेली आहे. तसेच कारखान्यातील को-जन प्रकल्पाद्वारे ३,४४,७१, ८०० युनिट वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस निर्यात केली आहे. तर आसवणी प्रकल्पाच्या माध्यमातून १२७ दिवसात १,८०,१८,४६८ लिटर सिरप ईथेनाल उत्पादन घेण्यात आल्याचे सांगत पुढील २०२६-२७ हंगामासाठी १३,५४० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आतापासून सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.


















