भारतात पेट्रोल पंप किंवा एलपीजी वितरकांकडे इंधन तुटवडा नाही : केंद्र सरकार

नवी दिल्ली : भारतात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पेट्रोल पंप आणि एलपीजी वितरकांकडे इंधन संपल्याची कोणतीही घटना घडलेली नाही, असे केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केले. मात्र एलपीजी पुरवठ्याबाबत काही प्रमाणात चिंता कायम असल्याचेही सांगण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आंतर-मंत्रालयीय पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात एलपीजी वितरकांकडे गॅसचा तुटवडा झाल्याची एकही घटना नोंदवलेली नाही.

सुजाता शर्मा म्हणाल्या, कच्चे तेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. पेट्रोल पंपही नियमितपणे सुरू आहेत. कुठेही इंधन संपल्याची नोंद नाही. पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) आणि सीएनजी वापरणाऱ्या वाहतूक क्षेत्रातील ग्राहकांना 100 टक्के पुरवठा कायम ठेवला जात आहे.सरकारने सांगितले की, घरगुती ग्राहक आणि प्राधान्य क्षेत्रांना अखंडित एलपीजी पुरवठा सुनिश्चित करणे हे सरकारचे प्राधान्य आहे.

सरकारने पुन्हा एकदा ग्राहकांना शक्य असल्यास एलपीजीऐवजी पीएनजी कनेक्शन घेण्याचे आवाहन केले आहे.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही गॅस कंपन्यांनी प्रोत्साहन योजना देखील जाहीर केल्या आहेत.मोठ्या शहरांतील आणि शहरी भागांतील व्यावसायिक एलपीजी वापरकर्त्यांना पीएनजी कनेक्शन घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी ते ईमेल, पत्र किंवा सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD) कंपन्यांच्या ग्राहक पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

घरगुती वापरासाठी एलपीजीचा पुरवठा प्राधान्याने राखण्यासाठी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या विक्रीवर काही काळ निर्बंध घालण्यात आले होते. आता त्या विक्रीला अंशतः परवानगी देण्यात आली आहे.तेल विपणन कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांवर (पेट्रोल पंपांवर) इंधन संपल्याची कोणतीही घटना नोंदवलेली नाही. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. मात्र नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करू नये, असे सरकारने आवाहन केले.

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारांकडून कठोर कारवाई केली जात आहे. अनेक राज्यांत एलपीजी सिलिंडरच्या साठेबाजी आणि काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी छापे टाकले जात आहेत, असेही सांगण्यात आले. एलपीजीवरील दबाव कमी करण्यासाठी काही क्षेत्रांमध्ये विशेषतः हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगात केरोसीन आणि कोळसा यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर सुरू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here