सांगली : ‘दत्त इंडिया’कडून शेतकऱ्यांची १०० टक्के ऊस बिले अदा – उपाध्यक्ष शिंदे यांची माहिती

सांगली : येथील श्री दत्त इंडिया प्रा. लि. कंपनीकडून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नवव्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची सर्व १०० टक्के म्हणजे, सुमारे २८० कोटी रुपयांची ऊस बिले पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत. कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी ही माहिती दिली. यंदाच्या गळीत हंगामात शासनाच्या एफआरपी धोरणानुसार प्रतिटन उसाला ३२६२ रुपये देय होते. मात्र, कंपनीचे संचालक जितेंद्र धारू यांनी सामाजिक बांधिलकी जपत व शेतकरीहिताचा विचार करून प्रतिटन ३४०० रुपये दराने उसाचे बिल देण्याची घोषणा केली होती. ही सर्व बिले अदा करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले की, वसंतदादा साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात एकूण ८ लाख २३ हजार २१७ टन उसाचे गाळप करून विनाकपात ३४०० रुपये दराने तब्बल २७९ कोटी ८९ लाख ३७ हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा सहकार्य केले. श्री दत्त इंडिया कंपनीचे एकूण तीन साखर कारखाने असून, ऊस उपलब्धता कमी असतानाही वसंतदादा (सांगली), साखरवाडी- फलटण आणि कर्नाटकातील चडचण – हविनाळ या तिन्ही युनिट्समध्ये मिळून २१ लाख ३९ हजार १९८ टन उसाचे गाळप केले. या सर्व युनिट्सकडील शेतकऱ्यांची ऊस बिलेही दिली आहेत. हंगाम यशस्वितेसाठी सरव्यवस्थापक शरद मोरे, अमोल शिंदे, मोहन पवार, गौतम पासोबा यांच्यासह कामगार संघटनेचे सहकार्य मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here