रायबरेली : आपला ऊस घेतला जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी खडसावल्याने ऊस विभागाचे अधिकारी हादरले. साखर कारखान्याचे अधिकारीही जागे झाले. या पाठोपाठ जिल्हा ऊस अधिकारी, साखर कारखान्यातील अधिकारी सक्रिय झाले. परिणामी, पहूरी गावातील शेतकऱ्यांचा ऊस फतेहपूर जिल्ह्यातील सातगवान क्रशरमध्ये येऊ लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. साखर कारखान्याचे अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात पोहोचले आणि त्यांनी उसाची खरेदी सुरू केली आहे.
पहुरी परिसरातील ऊस वजनकाटा १० मार्च रोजी बंद करण्यात आला.त्यामुळे हजारो क्विंटल ऊस शेतातच उभा राहिला. वजनकाटा बंद झाल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. राणा बेनी माधव बक्स सिंग मेमोरियल कमिटीने ही बाब मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निदर्शनास आणली. त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. त्यानंतर आतापर्यंत चौदाशे क्विंटल ऊस खरेदी करून तो गाळपासाठई पोहोचवण्यात आला आहे. आजपर्यंत क्रशरमध्ये उसाचे पाच ट्रक दाखल झाले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी जगमोहन भदोरिया यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडील उर्वरित ऊस सर्व क्रशरांना पोहोचवला जाईल. काही शेतकऱ्यांचा ऊस बियाणे म्हणूनही वापरला जाईल. आतापर्यंत चौदाशे क्विंटल ऊस पाठवण्यात आला आहे. बियाण्यासाठी ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पंचवीस रुपये प्रोत्साहनपर रक्कमही मिळेल.


















