सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे तब्बल ९५० कोटी थकीत, कारखान्यांवरील कारवाईकडे लक्ष

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांपैकी तब्बल ३१ कारखान्यांकडे १५ मार्चअखेर सुमारे ९५० कोटी रुपयांची ऊसबिले थकीत आहेत.कायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना संपूर्ण ऊसबिले अदा करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी कारखान्यांचे उंबरठे शिजवावे लागत आहेत. फेब्रुवारीअखेर जिल्ह्यात १ कोटी ५७ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ६४३ कोटी रुपये मिळाले आहेत. एफआरपीनुसार २६ कारखान्यांकडे ४३२ कोटी रुपये थकीत आहेत. असे असले तरी, कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची सुमारे ९५० कोटी रुपयांची ऊसविले अडकली आहेत.

मागील महिन्यात आंदोलन केल्यानंतर १० मार्चपर्यंत आरआरसी कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. यासंदर्भात जिल्ह्यातील १७ कारखान्यांच्या सुनावण्या झाल्या आहेत आंदोलनानंतर १०० कोटी पकीत एफआरपीत घट झाली आहे. शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी मिळण्यासाठी कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडू ठरल्याप्रमाणे ऊसबिते मिळण्यासाठी १ एप्रिलनंतर कारखान्यांवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करणार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

केंद्र सरकार दरवर्षी एफआरपी वाढवते. मात्र, महागाई वाढेल या भीतीने साखरेचे दर (एमएसपी) वाढवत नाही. गेल्या पाच वर्षांपासून साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही. बहुतांश कारखान्यांना खर्च भागवण्याकरिता पुढील वर्षी उत्पादित होणाऱ्या साखर, बगॅस, मोलॅसिसवर कोट्यवधी रुपये अॅडव्हान्स उचलून मागील वर्षीची देणी द्यावी लागत आहेत. अशात गाळप हंगामाचे दिवस घटत चालले आहेत. त्यामुळे कारखान्यांचे अर्थकारण कोलमडते आहे, असे मत सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here