सोलापूर : जिल्ह्यात ३० कारखान्यांचा हंगाम समाप्त, आतापर्यंत १ कोटी ५९ लाख मे. टन उसाचे गाळप

सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांपैकी गोकुळ शुगर आणि आदिनाथ साखर कारखाना सुरूच झाले नाहीत. उर्वरित ३३ साखर कारखान्यांनी हंगामात सहभाग घेतला. आजअखेर ३३ साखर कारखान्यांपैकी ३० कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री, व्ही. पी. शुगर तडवळे, करमाळ्यातील विठ्ठल रिफायनरी हे तीन कारखाने अद्याप सुरू आहेत. या भागातील ऊस संपत आल्याने येत्या दोन दिवसात हे कारखाने बंद होतील अशी शक्यता आहे. जिल्ह्यातील बहुतांश ऊस गळीत हंगाम आटोपला असून कारखान्यांनी १ कोटी ५९ लाख ७८ हजार ४५३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत १ कोटी ४१ लाख ५३ हजार ३८६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ८.९४ टक्के आहे.

जिल्ह्यातील १२ खासगी साखर कारखान्यांनी ६६ लाख ४० हजार ९४१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५८ लाख ८० हजार २५५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यांचा साखर उतारा ८.८५ टक्के आहे. तर राज्यातील २३ सहकारी साखर कारखान्यांनी ९३ लाख ३७ हजार ५११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यंदाच्या हंगामात ऊस दरासाठी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे गळीत हंगामाला सुरुवातीला काही अडचणी निर्माण आल्या. कारखान्यांनी दर जाहीर केल्यानंतर गळीत हंगाम सुरळीत सुरू झाला होता. मात्र, अनेक कारखान्यांना गाळप क्षमतेनुसार ऊस उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे अनेकांना नाईलाजास्तव कारखाने मुदतीपूर्वीच बंद होतील, अशी परिस्थिती आहे. शेतकरी संघटनांच्या दबावापोटी अनेक साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले तरी अनेकांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा केलेली नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here