अहिल्यानगर : जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी गाळपाची सांगता होऊनही अद्याप पूर्ण एफआरपी अदा केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले असून, ऊस बिले वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेल्याचे चित्र आहे. अहिल्यानगर व नाशिक विभागातून १ कोटी २५ लाख मे. टन गाळप करण्यात आले. एफआरपीप्रमाणे संबंधित २२ कारखान्यांनी आतापर्यंत २९३६ कोटींचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. तर १६ कारखान्यांनी तब्बल ५१८ कोटींची एफआरपी थकवली आहे. याबाबत साखर आयुक्तांनी नगरचा अहवाल मागवला आहे.
जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी प्रती टन सरासरी तीन हजारांच्या आसपास भाव दिला. तर यंदाच्या हंगामात सर्वाधिक १ लाख ४९ हजार टन ऊस गाळप अंबालिका या खासगी कारखान्याने केले. आतापर्यंत कर्मवीर शंकरराव काळे, मुळा सहकारी, सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात, सहकार महर्षि शंकरराव कोल्हे कारखाना यांनी सर्व १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. मात्र, अन्य १६ कारखान्यांकडे अजूनही ५१८ कोटींची देणे बाकी आहे. काही कारखान्यांकडे केवळ १० ते १५ टक्के बाकी आहे. याबाबत साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दि. १५ मार्च रोजी ऊस पेमेंट अहवाल मागवला असून, त्यावरून एफआरपी थकवलेल्या कारखान्यांना नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता आहे. तर प्रशासनाने थकीत ऊस बिलांबाबत बघ्याची भूमिका घेतल्याची टीका शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.

















