नवी दिल्ली : भूराजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या घबराटीच्या खरेदीमुळे पश्चिम आशियाई देशांकडे तांदूळ आणि अन्नपदार्थांच्या निर्यातीत वाढ होत असल्याचे काही निर्यातदारांनी सांगितले आहे. वाहतूक खर्च दुप्पट आणि विमा खर्च तिपटीने वाढला असला तरी त्या बाजारपेठांमध्ये किंमती वाढल्या असूनही मागणी वाढत आहे.
“अशा प्रकारच्या भूराजकीय परिस्थिती निर्माण झाल्यावर अन्नपदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी लोक घरात साठा करण्यासाठी दुप्पट प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे मागणी वाढते आणि यावेळीही तसेच झाले आहे, असे तांदूळ निर्यात करणाऱ्या अमीर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेडचे संचालक राहुल सूरी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मुख्य अडचण ही लॉजिस्टिक्स आणि त्याचा खर्च आहे. अलीकडे पश्चिम आशियातील अनेक बंदरे पुन्हा सुरू झाली आहेत, त्यामुळे त्या बाजारपेठांकडे निर्यातीचे मार्ग उपलब्ध झाले आहेत. मात्र, वाहतूक आणि विमा खर्च वाढलेले आहेत. तरीही त्या बाजारातील ग्राहक वाढलेल्या मागणीमुळे अतिरिक्त दर देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. “पश्चिम आशियातून वाढलेल्या मागणीमुळे आम्हाला निर्यातीमध्ये कोणतीही अडचण येत नाही,” असे सूरी म्हणाले.
वाहतूक खर्च दुप्पट आणि विमा खर्च तिपटीने वाढला असला तरी उत्पादनांच्या किमतीत फक्त २ ते ३ टक्क्यांची वाढ होते, जी अशा परिस्थितीत फारशी मोठी नाही. पश्चिम आशियातील प्रभावित देशांकडे निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. घबराटीमुळे खरेदी वाढल्याने मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे सूरी यांनी सांगितले.
















