साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत; केवळ साखर उत्पादनातून नफा शक्य नाही : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भुईंज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि, साखर कारखानदारांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. फक्त साखर उत्पादनातून आता नफा मिळवणे कठीण झाले असून आगामी काळात साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल रिटेल पंप सुरू करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

किसान वीर साखर कारखाना परिसरात आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते त्यांना “देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार” प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री तसेच किसान वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

मंत्री गडकरी म्हणाले की, शेतकरी केवळ अन्नदाता नसून ऊर्जादाता देखील आहेत. आता त्यांना इंधन उत्पादक म्हणूनही ओळख मिळण्याची वेळ आली आहे. आगामी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 80 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात 100 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने विकसित करण्याचे निर्देश वाहन उत्पादक कंपन्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, शेतीमधील यंत्रसामग्री इथेनॉल किंवा बायो-सीएनजीवर चालवली तर उत्पादन खर्चात मोठी बचत होऊ शकते. तसेच कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.n सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गडकरी यांच्या विकासदृष्टीचा अनुभव राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रत्यक्ष आला असल्याचे सांगितले.

“वेस्ट टू वेल्थ” संकल्पना स्वीकारा

गडकरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. जर त्याची किंमत 100 रुपयांपर्यंत आणता आली तर भारत इंधन आयात करणारा नव्हे तर निर्यात करणारा देश बनू शकतो. देशातील पैसा परदेशात जाण्यापासून रोखणे हीच खरी देशभक्ती असल्याचे त्यांनी म्हटले. “वेस्ट टू वेल्थ” म्हणजेच कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याची संकल्पना शेतकऱ्यांनी स्वीकारावी, त्यामुळे त्यांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here