माण व खटाव तालुक्यातील शेती फुलणार: लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला मिळणार 1330 कोटी

सातारा: सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या दोन तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत असलेल्या जिहे-कठापूर येथील गुरूवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या 1330 कोटी 74 लाखाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील शेतीला सिंचनसुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे उपसा सिंचनावर शेतकऱ्यांचा होणारा खर्च वाचणार आहे.

गुरुवर्य कै.लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यातील कठापूर गावाजवळ असून या योजनेद्वारे एकुण 3 टप्प्यामध्ये (स्थिर उंची 209.84 मी.) 3.17 अ.घ.फु. पाणी उचलण्यात येणार आहे. याद्वारे खटाव तालुक्यातील 11 हजार 700 हेक्टर व माण तालुक्यातील 15 हजार 800 हेक्टर असे एकूण 27 हजार 500 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण पाणी वापर 3.17 अ.घ.फु. इतका असून त्यापैकी धोम बलकवडी धरणामधून 0.53 अ.घ.फु. व कृष्णा नदीतून 2.64 अ.घ.फु. इतका पाणी वापर नियोजित केला आहे.

या योजनेस महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने 11 फेब्रुवारी 1997 नुसार 269 कोटी 7 लाखाच्या प्रस्तावास मूळ प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. व त्यानंतर शासनाने 6 नोव्हेंबर 2017 ला 1085 कोटी 54 लाखाच्या किंमतीस प्रथम सुप्रमा प्रदान केली आहे.

प्रथम सुप्रमानुसार माण नदीवरील 17 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील 15 हजार 800 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खासगी उपसा सिंचनाद्वारे सिंचनाखाली आणणे प्रस्तावित होते. तथापि हा भाग दुष्काळी असल्याने लाभधारकांची स्वखर्चाने उपसा करण्याची क्षमता नसल्याने शासकीय उपसा सिंचन योजना राबविण्याची मागणी होती. त्यामुळे प्रकल्पामध्ये आंधळी उपसा सिंचन योजनेचा नव्याने समावेश करुन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिलेल्या प्रकल्पाच्या व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here