कोल्हापूर : टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्स यांना सामाजिक बांधीलकी आणि उल्लेखनीय समाजोपयोगी कार्याबद्दल वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) तर्फे सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे आयोजित शुगर व बायोएनर्जी पुरस्कार वितरण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला.
कारखान्याच्या वतीने एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व अधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदत्त शुगर्सने सामाजिक कार्यामधून परिसराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुरांच्या काळात कारखान्याने पूरग्रस्त नागरिक आणि जनावरांसाठी स्वखर्चाने छावण्या उभारून मोठी मदत केली. तसेच २०१८ मधील केरळ महापूर आणि २०२५ मधील मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. कोरोना महामारी काळात मदत, औषध उपचार केले आहेत.


















