पुणे : दौंड तालुक्यातील परप्रांतीय गुऱ्हाळ चालक आणि ऊस पुरवठादार यांच्या संयुक्त बैठकीत ऊस खरेदी दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या बैठकीत उसाला प्रतिटन ४००० ते ४२०० रुपये दिला जाणारा बाजारभाव कमी करून तो थेट ३५०० रुपये निश्चित करण्यात आला. दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ उद्योगामुळे अनेक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांच्या तुलनेत थेट आणि चांगला दर मिळत होता. त्यामुळे हा उद्योग कारखानदारीला पर्याय म्हणून पुढे आला होता. मात्र, दरनिश्चितीवर परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांच्या युनियनचा प्रभाव वाढल्याचा आरोप शेतकरी करत असून, शेतात रात्रंदिवस कष्ट करून उभे केलेल्या पिकाचा दर बाहेरील घटकांनी ठरवणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तालुक्यातील खामगाव, सहजपूर आणि बोरीपारधी परिसरातील गुऱ्हाळघरांवर केलेल्या धडक कारवाईत १७ लाख रुपयांचे अपमिश्रित साखर आणि गूळ जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर काही काळ गुऱ्हाळ घरे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर बैठक घेऊन गुऱ्हाळघरे सुरू झाली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या बंदनंतर शेतकऱ्यांच्या मालाच्या दरात प्रतिटन तब्बल ७०० रुपयांची घट झाल्याने शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऊस उत्पादनासाठी वाढलेला खर्च, मजुरी, खतांचे दर आणि सिंचनावरील खर्च लक्षात घेता हा शेतकऱ्यांना मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब देशमुख म्हणाले की, गुऱ्हाळघरांमुळे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला थेट आणि चांगला दर मिळत होता; परंतु परप्रांतीयांच्या युनियनमुळे ऊसदरात प्रतिटन ७०० ते ८०० रुपयांची घट झाली आहे. यामुळे कृषी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे.















