नवी दिल्ली : भारतीय साखर व जैव-ऊर्जा उत्पादक संघटना (ISMA) चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी सांगितले की, धान्य-आधारित इथेनॉलचे उत्पादन साखर-आधारित इथेनॉलपेक्षा अधिक होणे ही साखर उद्योगासाठी चिंतेची बाब नाही. उलट, दोन्ही प्रकारचे फीडस्टॉक भारताच्या इथेनॉल मिश्रण (ब्लेंडिंग) कार्यक्रमाला बळकटी देत असून देशाची ऊर्जा सुरक्षितता मजबूत करण्यास मदत करत आहेत. ते म्हणाले की, भारतातील इथेनॉल उद्योग आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. भविष्यात या क्षेत्रातील वाढ नव्या उत्पादन क्षमतेवर नव्हे, तर वाढत्या मागणीवर अवलंबून असेल. उद्योग तज्ज्ञांच्या मते, साखर व धान्य-आधारित इथेनॉल उत्पादकांनी आधीच पुरेशी उत्पादन क्षमता निर्माण केली असून, आता फ्लेक्स-फ्यूल वाहनांचा वाढता वापर आणि अधिक इथेनॉल मिश्रित इंधनामुळे मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
धान्य-आधारित इथेनॉलचा वाटा वाढला…
एलारा सिक्युरिटीजचे संस्थात्मक इक्विटी उपाध्यक्ष प्रशांत बियाणी यांच्या मते, सध्या देशातील एकूण इथेनॉल उत्पादनापैकी सुमारे 70 टक्के उत्पादन धान्य-आधारित इथेनॉलचे आहे, तर साखर-आधारित इथेनॉलचा वाटा 30 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. यापूर्वी दोन्हींचा वाटा जवळपास समान होता. मात्र, ऊसाचा वाढता खर्च आणि इथेनॉलच्या किमतीत त्यानुसार वाढ न झाल्यामुळे साखर-आधारित इथेनॉल उत्पादनाचे आकर्षण कमी झाले आहे.
सध्या नवीन उत्पादन क्षमता उभारण्याची गरज नाही…
दीपक बल्लानी यांनी सांगितले की, साखर आणि धान्य-आधारित इथेनॉल मिळून देशात सुमारे 2,000 कोटी लिटर वार्षिक उत्पादन क्षमता उपलब्ध आहे. मात्र, सध्याची मागणी केवळ 1,100 ते 1,200 कोटी लिटर इतकी आहे. त्यामुळे विद्यमान क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही तोपर्यंत नवीन उत्पादन क्षमता उभारण्यात कोणताही आर्थिक फायदा नाही. त्यांनी पुढे सांगितले की, अनेक साखर कारखान्यांनी ड्युअल-फीड डिस्टिलरी उभारल्या आहेत. या डिस्टिलरी गाळप हंगामात ऊसापासून इथेनॉल तयार करतात, तर उर्वरित काळात धान्यापासून इथेनॉलचे उत्पादन करतात. त्यामुळे उत्पादनात लवचिकता मिळते. मात्र, सध्या अतिरिक्त क्षमता वाढविण्याचा उद्योगाचा कोणताही विचार नाही.
फ्लेक्स-फ्यूल वाहनांमुळे वाढेल इथेनॉलची मागणी…
उद्योग क्षेत्राचा विश्वास आहे की, फ्लेक्स-फ्यूल वाहनांचा वापर वाढल्याने इथेनॉलची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढेल. मारुती सुझुकीने नुकतेच आपले पहिले फ्लेक्स-फ्यूल वाहन बाजारात आणले असून, केंद्र सरकारने अशा वाहनांसाठी ई-85 (E85) इंधनही उपलब्ध करून दिले आहे. भविष्यात ई-20 ते ई-100 पर्यंत अधिक इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर वाढल्यास विद्यमान उत्पादन क्षमतेचा अधिक प्रभावी वापर होईल, असा उद्योगाचा विश्वास आहे.फ्लेक्स-फ्यूल वाहन म्हणजे असे वाहन, जे ई-20 ते ई-100 पर्यंत कोणत्याही प्रमाणातील इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकते.


















