सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सध्या दररोज ३० टन सीएनजीचे उत्पादन होत आहे. ऊस प्रक्रियेतून तयार होणारी मळी आणि इथेनॉल निर्मितीनंतर उरणारे द्रव अवशेष यांचा वापर करून सीएनजी निर्मिती करण्याकडे साखर कारखाने आणि खासगी उद्योगांचा कल वाढला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात सात साखर कारखाने आणि १७ खासगी कंपन्यांचे सीएनजी प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. सीएनजी विक्रीसाठी उत्पादकांकडून गेल (गॅस इंडिया लिमिटेड) आणि इंडियन मोलॅसिस कंपनी (आयएमसीएल) यांच्याशी करार केले जात आहेत. जिल्ह्याची एकूण सीएनजी उत्पादन क्षमता रोज तब्बल ३६३ टनांवर जाणार आहे. ही सीएनजी उत्पादन क्षमता स्थानिक मागणीच्या तीनपट असेल.
जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांची एकूण क्षमता १२१ टन प्रतिदिन आहे. यामध्ये श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ३० टन, सिताराम महाराज सहकारी साखर कारखाना : १० टन, मल्हार साखर कारखाना : २५ टन, श्री संत कुर्मदास साखर कारखाना : ५ टन, अवताडे शुगर अँड डिस्टिलरी प्रा. लि. : २७ टन, पांडुरंग सहकारी साखर कारखाना : १२ टन आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखाना १२ टन अशी स्थिती आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने तीन प्रकल्पांची, तर अवताडे शुगर अँड डिस्टिलरीने दोन प्रकल्पांची नोंदणी केली आहे.
खासगी क्षेत्रात साई बायोएनर्जी महाराष्ट्र प्रा. लि.चा ३० टन क्षमतेचा प्रकल्प सर्वांत मोठा असून, ब्लिसपर इंडिया एनर्जी प्रा. लि. आणि श्री सुरास इंडस्ट्रिज लि. यांचे प्रत्येकी २४ टन क्षमतेचे प्रकल्पही उभारले जात आहेत. तर १७ खासगी कंपन्यांची क्षमता २१२ टन प्रतिदिन असेल. यामध्ये श्री सुरास इंडस्ट्रिज लि., सुर्यास्टोन इंडस्ट्रिज लि., गुलमायर सॅनिटरी वेअर दोन प्रकल्प, पाटील इंटरप्रायजेस, आर. के. बायोएनर्जी प्रा. लि., स्वास्तिक गॅस, तुळशीराम इंटरप्रायजेस, प्रभाकर ग्रीन एनर्जी प्रा. लि., सोलरा बायो एनर्जीतर्फे दोन प्रकल्प, एक्सएलएनजी एनव्हायरो प्रा. लि., येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्ट्स लि., एक्सईएमएक्स प्रोजेक्ट प्रा. लि., कल्पतरू ग्रामीण विकास फाउंडेशन, वसुंधरा अॅग्रो प्रा. लि., साई बायोएनर्जी महाराष्ट्र प्रा. लि., सृष्टी इको रिसायकलिंग प्रा. लि., आणि ब्लिसपर इंडिया एनर्जी प्रा. लि. यांचा समावेश असेल.















