नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी नीट-युजी २०२६ (NEET-UG 2026) पेपर लीक वादाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशातील तरुण “भ्रमाच्या जाळ्यात अडकू नयेत” आणि विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी आपण हे पद सोडत असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात, प्रधान यांनी शिक्षणाशी असलेल्या त्यांच्या प्रदीर्घ संबंधांवर प्रकाश टाकला आणि भारताच्या तरुणांच्या आकांक्षांबद्दलच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “चार दशकांहून अधिक काळ मी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणांच्या कार्याशी जोडला गेलो आहे. एक मजबूत, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख शिक्षण प्रणाली हाच एका मजबूत राष्ट्राचा पाया असतो, असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे”.
नीट-युजी विवादाचा उल्लेख करताना प्रधान म्हणाले की, ३ मे रोजी झालेल्या परीक्षेत अनियमितता समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली होती. “३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षेत अनियमितता आढळून आली. भारत सरकारने तातडीने या प्रकरणाची दखल घेत हा तपास सीबीआयकडे (CBI) सुपूर्द केला, परीक्षा रद्द केली आणि फेर परीक्षेच्या तारखेची घोषणा केली. यासोबतच, पुढील वर्षापासून ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे”,” असे त्यांनी नमूद केले.
पुनर्परीक्षा प्रक्रियेदरम्यान २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे संबलपूरच्या खासदारांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “या काळात आमची मुख्य काळजी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची होती.. पहिल्या दिवसापासून मी या परिस्थितीची जबाबदारी घेतली आणि कधीही त्यापासून पाठ फिरवली नाही. परीक्षा वादामुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याच्या भवितव्याचे नुकसान होऊ देणार नाही, असा माझा संकल्प होता”.
१६ जुलै रोजी जाहीर झालेले नीट-युजीचे निकाल समाधानकारक होते, ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनीही यश मिळवले, असेही त्यांनी नमूद केले. या मुद्द्याभोवती रंगलेल्या राजकीय घडामोडींवर निराशा व्यक्त करत प्रधान यांनी आरोप केला की, काही व्यक्तींनी विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पत्रात लिहिले, “परंतु, या काळात जबाबदार पदांवर बसलेल्या अनेक व्यक्तींनी अडथळे निर्माण करण्याचा आणि विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मला तीव्र दुःख झाले आहे”.
आपल्या राजीनाम्यामागील कारणे स्पष्ट करताना प्रधान म्हणाले की, सुरू असलेल्या आंदोलनांचा देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी सांगितले की, गेल्या १० दिवसांतील घडामोडींनी मला दुःखी केले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही… देशातील तरुण शक्तीला भ्रमाच्या जाळ्यात अडकू देणार नाही, असा माझा संकल्प आहे. जंतरमंतर आणि देशात इतरत्र निर्माण झालेल्या परिस्थितीचा देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेता कामा नये… या बाबी लक्षात घेऊन मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे”.
प्रधान यांनी शिक्षण मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि आपल्या कॅबिनेट सहकाऱ्यांचे, मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. “मी माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाबद्दल, विश्वासाबद्दल आणि सततच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो… देशाची सेवा करणे ही माझ्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी नेहमीच समर्पित राहीन”,” असे त्यांनी म्हटले.


















