नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. यात व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा घालणे, कारखान्यांतील प्रत्यक्ष साठ्याची तपासणी, घाऊक खरेदीदारांवर साठा मर्यादा आणि दहा लाख टन कच्च्या साखरेची विनाशुल्क आयात या उपायांचा समावेश आहे. याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय सहकारी साखर संघ हा सरकारबरोबर असल्याचे संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. साखर दरात अचानक झालेल्या वाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखानदार, साखर व्यापारी, ग्राहकसुद्धा आश्चर्यचकित झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, साखरेच्या किमती वाढण्यामागे इथेनॉलचा वापर कारणीभूत असल्याचा प्रचार चुकीचा आहे. इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे .याबाबत कोणाचेच दुमत नाही. मात्र, साखर कारखान्यांनी क्षमता निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तरीही इथेनॉल खरेदीचे दर गेल्या चार वर्षापासून स्थिर आहेत. सध्या उसाचा वाढता दर आणि इतर खर्च लक्षात घेता इथेनॉल खरेदी दरात वाढ करावी अशी आमची अपेक्षा आहे. तसेच साखरेची किमान विक्री किंमत ४३ रुपयांपर्यंत वाढवावी. चालू हंगामातील साखरेची सरासरी विक्री किंमत अजूनही प्रति किलो ४० रुपयांच्या आसपास आहे. सध्याच्या संकटावर संयुक्त प्रयत्नांतून मात करण्याच्या उद्देशाने संबंधित राज्य सरकारने परवानगी दिल्यास सहकारी साखर कारखाने १५ ऑक्टोबरपर्यंत गाळप हंगाम सुरू करण्यासाठी प्रयत्न करतील.


















