नवी दिल्ली: भारतासाठी 1.5 अब्ज डॉलरहून अधिक गहू निर्यातीची संधी निर्माण झाली आहे. निर्यातीवरील निर्बंध हळूहळू शिथिल होत असताना देशातील मजबूत उत्पादन, पुरेसा साठा आणि प्रमुख जागतिक खरेदीदारांकडून गव्हाच्या पुरवठा स्रोतांमध्ये विविधता आणण्याचे प्रयत्न भारतासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे ‘असोचॅम’च्या (ASSOCHAM) अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, भारतातील विक्रमी गहू उत्पादन आणि उपलब्ध अतिरिक्त साठ्यामुळे देशांतर्गत अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करतानाच गहू निर्यात वाढविण्यास मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
‘असोचॅम’ने म्हटले आहे की, भारत अलीकडील काही वर्षांतील जागतिक गहू व्यापाराच्या सर्वाधिक आशादायी टप्प्यात प्रवेश करत आहे. जवळपास चार वर्षे लागू असलेल्या निर्यात निर्बंधांनंतर 2026 मध्ये गहू निर्यात हळूहळू खुली करण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने गव्हाच्या काही निश्चित वाणांसह गव्हाचे पीठ आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यात धोरणातही बदल केला आहे. गहू, ड्युरम गहू, आटा, मैदा आणि रवा/सूजी यांसह या उत्पादनांना ‘प्रतिबंधित’ श्रेणीतून ‘मुक्त’ निर्यात धोरणाच्या कक्षेत आणण्यात आले आहे.
भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात विक्रमी 120.7 दशलक्ष टन (MMT) गव्हाचे उत्पादन केले. त्यामुळे भारताचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे गहू उत्पादक राष्ट्र म्हणून स्थान कायम आहे.28 मे 2026 रोजी केंद्रीय साठ्यात 51.3 दशलक्ष टन गहू उपलब्ध होता. 1 जुलैसाठी निर्धारित बफर स्टॉकचा निकष 27.58 दशलक्ष टन आहे. भारताची सध्याची गहू निर्यात देशाच्या उत्पादन क्षमतेच्या आणि उपलब्ध अतिरिक्त साठ्याच्या तुलनेत अजूनही कमी आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांत गहू निर्यात मोठ्या प्रमाणात वाढविण्यास लक्षणीय वाव असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक बाजारपेठेत भारताला किमतीच्या बाबतीतही फायदा होऊ शकतो. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताचा गव्हाचा किमान आधारभूत किंमत (MSP) प्रति टन सुमारे 268 अमेरिकी डॉलर इतकी होती. त्याच वेळी मे 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील गव्हाची किंमत सुमारे 303 अमेरिकी डॉलर प्रति टन होती. म्हणजेच दोन्ही किंमतींमध्ये जवळपास 35 डॉलर प्रति टनाचा फरक होता.
अहवालानुसार, बांगलादेश हा भारतीय गव्हासाठी सर्वात मोठी संधी असलेला बाजार ठरू शकतो. याशिवाय इजिप्त, इंडोनेशिया, अल्जेरिया, मोरोक्को आणि फिलिपिन्स या देशांमध्येही टप्प्याटप्प्याने निर्यात वाढविण्याची संधी आहे.2024-25 मध्ये बांगलादेशने सुमारे 6.7 दशलक्ष टन गव्हाची आयात केली होती. भारत आधीपासूनच बांगलादेशच्या प्रमुख गहू पुरवठादारांपैकी एक आहे.
जागतिक गहू उत्पादन 2026-27 मध्ये घटून सुमारे 819 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. 2025-26 मध्ये जागतिक गहू उत्पादन विक्रमी 843.8 दशलक्ष टन होते. प्रमुख गहू निर्यातदार देशांमधील हवामानाशी संबंधित आव्हानांमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रमुख गहू आयातदार देश अधिक विविध आणि विश्वासार्ह पुरवठादारांचा शोध घेत आहेत. त्यामुळे जागतिक गहू बाजारपेठेत भारताला आपले स्थान मजबूत करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.मात्र, दीर्घकालीन यशासाठी भारताला गव्हाची सातत्यपूर्ण गुणवत्ता, चांगली लॉजिस्टिक्स व्यवस्था, सुधारित साठवणूक व चाचणी सुविधा आणि निर्यात धोरणांमध्ये अधिक स्पष्टता यावर भर द्यावा लागेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘असोचॅम’च्या मते, निर्यातीबाबत टप्प्याटप्प्याने आणि अंदाज करता येईल असे धोरण राबविण्यासोबतच साठवणूक, वाहतूक आणि बंदरांच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली, तर भारत जागतिक बाजारपेठेतील अधिक विश्वासार्ह गहू पुरवठादार बनू शकतो.

















