बेळगाव : नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाकडून मंगळवारी (ता. २२) विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमात येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने उच्च रिकव्हरीमधील सर्वोत्कृष्ट सहकारी डिस्टिलरीसाठीचा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, छत्तीसगडचे मंत्री केदार कश्यप, महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, हरियानाचे मंत्री अरविंद शर्मा, गुजरातचे पाटबंधारे मंत्री ईश्वरसिंह पटेल, पंजाबचे मंत्री गुरमीत सिंह खुड्डिया व मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, अध्यक्ष जयकुमार खोत यांच्यासह संचालक उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकरी, सभासद व कारखाना हितासाठी वेगवेगळे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. त्याची दखल नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने घेतल्याने कारखान्याने राष्ट्रीय पातळीवर कामगिरी सिध्द झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा पुरस्कार लाभला असून राज्यात हा मान केवळ ‘हालसिद्धनाथ’ला मिळाला आहे. आमदार शशिकला जोल्ले यांनी हा पुरस्कार सीमाभागातील ऊस उत्पादकांसह शेतकऱ्यांचा गौरव असल्याचे सांगितले. सुनील पाटील, संचालक अप्पासाहेब जोल्ले, प्रकाश शिंदे, रमेश पाटील, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, शरद जंगटे, श्रीकांत बन्ने, देवाप्पा देवदत्ते, सुहास गुग्गे, रावसाहेब फराळे, किरण निकाडे, आनंद यादव, आर. एल. चौगुले आदींनी पुरस्कार स्वीकारला.


















