बेळगाव : सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत कर्नाटक युनायटेड शुगर वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील इंजिनिअर्स इन्स्टिट्यूट सभागृहात रविवारी राज्यस्तरीय साखर कामगारांचा महामेळावा झाला. कामगारांचे हित जपण्याची मागणी करत सरदार्स मैदानापासून हजारो कामगारांनी मोर्चा काढला. राज्यातील सर्व साखर कारखान्यांत सातव्या त्रिपक्षीय वेतन आयोगाची अंमलबजावणी करून थकीत वेतन द्यावे व आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू करावी, बंद सरकारी व सहकारी साखर कारखाने पुनरुज्जीवित करावेत, दीर्घकाळ काम करणाऱ्या कंत्राटी व रोजंदारी कामगारांना कायम करून कायदेशीर सुविधा द्याव्यात, तसेच केंद्र सरकारने लागू केलेले चार लेबर कोड मागे घ्यावेत, असे चार ठराव करण्यात आले. सातव्या वेतन आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी सरकारने प्रभावी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
‘एआययूटीयूसी’चे राज्याध्यक्ष के. सोमशेखर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ‘केयुएसडब्लूएफ’चे अध्यक्ष अरवी बसवन गौड होते. फेडरेशनचे सरचिटणीस चंद्रशेखर मेती यांनी साखर कारखान्यांतील कामगारांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. दीर्घकाळापासून कारखान्यांत कार्यरत असलेल्या कंत्राटी, रोजंदारी व बाह्यकंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे, रोजगाराची सुरक्षा द्यावी तसेच कंत्राटदार बदलला तरी कामगारांचा रोजगार कायम ठेवावा, अशा मागण्या मेळाव्यात करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे कामगारांचे अधिकार धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय पीएफ, ईएसआय, बोनस, ग्रॅच्युइटी, रजा व साप्ताहिक सुटी आदी कायदेशीर सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. मेळाव्यास फेडरेशनचे पदाधिकारी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि राज्यातील साखर कामगार उपस्थित होते.


















