बीजिंग: जगभरात इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 2 जी 3 जी आणि 4 जी नंतर आता 5 जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. चीनमध्ये तीन सरकारी कंपन्यांनी गुरुवारी (1 नोव्हेंबर) 5 जी सेवा सुरू केली आहे. चायना मोबाईलने बीजिंग, शांघाय आणि शेनझेनसमवेत 50 शहरांमध्ये 5 जी सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. मात्र ग्राहकांना यासाठी दरमहा 128 युआन म्हणजे जवळपास 1300 रुपये मोजावे लागणार आहेत.
5 जी सेवेसाठी चीनमध्ये प्रमुख स्पर्धक कंपन्या असणार्या चायना टेलिकॉम आणि चायना युनिकॉर्न यांनीही ग्राहकांसाठी विविध योजना आणि ऑफर्स देत 5 जी सेवा सुरू केली आहे. त्यांच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. बीजिंगमध्ये झालेल्या तंत्रज्ञान परिषदेत अधिकार्यांनी तीन सरकारी कंपन्या शुक्रवारपासून ’फाइव्ह जी’ सेवेची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. डिसेंबर अखेरीस चीनमधील पन्नासहून अधिक शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये 5 जी ने चीनमधील सरकार आणि उद्योगांचे लक्ष वेधले आहे. 5 जी सेवेकडे वरदान म्हणूनही पाहिले जाण्याची शक्यता आहे. या माध्यमातून काही मिनिटांत चित्रपट डाउनलोड करण्यासोबतच सेल्फ ड्रायव्हिंग कार, रोबोटिक सर्जरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक नियंत्रणासाठी उपयोग होण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये एटी अॅन्ड टी, व्हेरीझॉन आणि टी-मोबाईल A या सेवा पुरवठादारांनी ग्राहकांसाठी काही निवडक शहरांमध्ये 5 जी नेटवर्क उपलब्ध करून दिले होते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत कैक मैल पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाने नाही तर दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने काही दिवसांपूर्वी जगात पहिल्यांदा 5 जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
दक्षिण कोरियाने यापूर्वी 5 एप्रिल ही देशात 5 जी सेवा सुरु करण्यासाठी तारीख निश्चित केली होती. मात्र, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी दोन दिवस आधीच ही सेवा सुरु करण्यात आली. 4 जी च्या तुलनेत 5 जी 20 पटींनी वेगवान असणार आहे. दक्षिण कोरियाच्या टॉपच्या टेलिकॉम कंपन्या एसके, केटी आणि एलजी यूप्लस यांनी 5 जी सेवा देशभरात देण्यास सुरुवात केली. सॅमसंगच्या नव्या गॅलेक्सी एस 10 5 जी मॉडेलवर पहिल्यांदाच 5 जी ची सेवा सुरू करण्यात आली. सॅमसंगही देखील कोरियाचीच कंपनी आहे. सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत 2 हजार डॉलर आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.














