नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनाने 1.03 लाख कोटी रुपयांचा स्तर गाठला. मात्र तीन महिन्यांच्या कालावधीनंतर जीएसटी संकलनास एक लाख कोटींचा टप्पा पार करता आला. दुसरीकडे जीडीपीच्या वृद्धीदरातही सतत घसरण होत असून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत हा वृद्धीदर 4.5 टक्क्यांपर्यंत खालावला. जीएसटीतून अपेक्षित वसुली होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काही वस्तूंवरील करात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती केेंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी दिली.
ठाकुर म्हणाले, जीएसटी परिषदेची बैठक 18 डिसेंबरला होणार आहे. यावेळी जीएसटीबाबत निर्णय घेण्यात येईल. या पार्श्वभूमीवर या बैठकीस महत्त्व प्राप्त झाले असून सरकारने त्यापूर्वीच राज्य सरकारांशी संभाव्य जीएसटी बदलांबाबत चर्चा सुरू केली असून राज्यांचे अभिप्राय मागवले आहेत.
बिगर भाजपशासित राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी तसेच, प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. केंद्राकडून राज्यांना देण्यात येणार्या जीएसटी भरपाईत होत असलेल्या विलंबाबद्दल या प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्र्यांजवळ चिंता व्यक्त केली. यामध्ये दिल्ली, पंजाब, पुद्दुचेरी आणि मध्य प्रदेशचे अर्थमंत्री तसेच, केरळ, राजस्थान, छत्तीसगड व प. बंगालच्या प्रतिनिधींचा समावेश होता
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.
















