मोहोळ(सोलापूर): भीमा सहकारी साखर कारखाना गेल्या दोन वर्षाच्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत आला आहे. त्यातच विस्तारीकरण व सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे दरम्यान, सर्व घडामोडीत कामगारांचा पगार, निवृत्तीवेतन आणि शेतकर्यांच्या ऊसाची एफआरपीची रक्कम थकली आहे. ही देणी कामगारांच्या खात्यावर 5 मार्चपर्यंत जमा होतील, असे लेखी पत्र कारखाना प्रशासनाच्या वतीने सहसीलदार जीवन बनसोडे यांनी कामगारांना दिले.
थकीत देण्यांसाठी कामगारांनी 16 दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. उपोषणकर्त्यांची कारखान्याचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक, माजी आमदार राजन पाटील यांनी भेट घेतली. कामगारांना कारखान्याच्या अडचणीबाबत सांगितले. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनीही बैठक घेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
याबाबत जिल्हाधिक़ारी मिलिंद शंभरकर यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, तहसीलदार जीवन बनसोडे व कामगार प्रतिनिधींची बैठक आयोजित केली. या बैठक़ीत चर्चा होऊन पैसे जमा करण्याचे ठरले . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, शिवसेनेचे तालकाप्रमुख अशोक भोसले, राष्ट्रवादीचे पक्षनेते ज्ञानेश्वर चव्हाण, दत्ता म्हस्के, दीपक भोसले व कामगार उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.