नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसून येत नाही. गॅस कंपन्यांनी देशाला महागाईचा मोठा झटका दिला आहे. गॅस कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत गॅसची किंमत १००३ रुपयांवरून वाढून १०५३ रुपये झाली आहे.
याबाबत टीव्ही९हिंदी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, १४.२ किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या नव्या किमती ६ जुलैपासून लागू होतील. जर तुम्ही आज गॅस सिलिंडर बुक करत असाल तर तुम्हाला १००३ ऐवजी १०५३ रुपये द्यावे लागतील. देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरच्या दराचा आढावा घेतला असता दिसून आले की, या वर्षभरात १५० रुपयांची दरवाढ झाली आहे. इंडियन ऑईलकडून मिळालेल्या माहितीनुसार ६ ऑक्टोबर २०२१ ते २१ मार्च २०२२ पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर होते. २२ मार्च रोजी गॅस दरात ५० रुपयांची वाढ होऊन सिलिंडर ८९९.५० रुपयांवरुन ९४९.५० रुपयांवर पोहोचला. ७ मे रोजी पुन्हा ५० रुपयांची दरवाढ झाली. त्यानंतर सिलिंडरचा दर ९९९.५० रुपये झाला. त्यानंतर काही दिवसांत १९ मे रोजी सिलिंडरच्या दरात ३.५० रुपयांची दरवाढ होऊन सिलिंडर १००३ रुपयांवर पोहोचला होता. आता यात पुन्हा ५० रुपयांची वाढ झाली आहे.












