सोलापूर : माढा तालुक्यातील अकोले बुद्रूकच्या महेश राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने गेल्या ६ ते ७ वर्षांपासून काळ्या उसाचे उत्पादन घेतले आहे. हा ऊस खाण्यासाठी मऊ असून मॉलमध्ये किंवा इतर ठिकाणी १०० रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होत आहे. या ऊस विक्रीतून पाटील यांना वर्षाला ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. पाटील यांनी बीएससी अॅग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं. त्यांनी सुरुवातीला दोन एकरात शिवकालीन काळ्या उसाची लागवड केली. या उसाची लागवड गुजरात, मध्य प्रदेशात केली जाते. औषधी गुणधर्म पाहता या काळ्या उसाला अधिक मागणी आहे.
युवा शेतकरी पुरस्कार मिळालेले महेश पाटील सांगतात की, हा ऊस ३० रोगांवर गुणकारी. काळ्या उसापासून विविध प्रॉडक्ट तयार करून सुद्धा विक्री केली जाते. तो खाण्यासाठी गोड, सोलण्यासाठी मऊ आहे. काळ्या उसाची विक्री मोठमोठ्या मॉलमध्ये केली जाते. कृषी प्रदर्शनामध्ये आणि उसाच्या रस विक्री करणाऱ्यांना विक्री केली जाते. हा शिवकालीन काळा ऊस १०० रुपये किलो दराने विक्री होतो. या उसामुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची चांगली संधी मिळू शकते, असे पाटील सांगतात.