कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने झालेल्या शिरोळ तालुक्यातील आठ गावांतील जमीन सुधारणा प्रकल्पास राष्ट्रीय ग्रामीण कृषी रोज डे अंतर्गत शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपये अनुदान मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती दत साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी पत्रकारांना दिली. दत्त साखर कारखाना कार्यक्षेत्रातील पिकाऊ शेतजमिनीमधील माती, पाणी आणि पिकांच्या पानांची तपासणी, तसेच संशोधकांच्या मतांचा विचार घेऊन पीक जमीन सुधारणा करण्याचे काम सुरू केले आहे.
शिरोळ परिसरात कारखान्यामार्फत सन २०१६ पासून क्षारपड जमिनी क्षारमुक्त करण्याच्या प्रकल्पाची सुरुवात केली. या प्रकल्पातील शेडशाळ, अर्जुनवाड, कवठेसार, गणेशवाडी, कुटवाड, हासूर, औरवाड व बुबनाळ येथील शेतकऱ्यांना रुपये १ कोटी ६० लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. एकूण १९१० हेक्टरसाठी ११.४६ कोटी मंजूर होऊन एकूण ९.२५ कोटी आतापर्यंत क्षारपड जमीन सुधारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मिळाली आहे. उर्वरित क्षारपड जमीन सुधारणा शेतकऱ्यांना २.२५ कोटी रक्कम अद्याप मिळणार आहे. त्यामुळे श्री दत्त कारखान्याच्या वतीने क्षारपडमुक्तीचा श्री दत्त पॅटर्न शिरोळ व अन्य परिसरातील सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारण्याच्या प्रकल्पाची खासकरून केंद्र व राज्य शासनाने दखल घेऊन देशपातळीवरील नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून गौरवले आहे.
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची जमीन क्षारमुक्त होऊन त्या ठिकाणी ऊस, हरभरा, शाळू, फुलशेती इत्यादी पिके शेतकरी घेऊ लागले आहेत. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी नवे बळ मिळून शिरोळ तालु तालुक्यातील संपूर्ण जमिनी क्षारमुक्त होतील, अशी आशा आहे. हे अनुदान प्राप्त होण्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय मृदा संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्र कसबे डिग्रज यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.














