कोल्हापूर : देशात उत्पादित होणाऱ्या उसाच्या २५ टक्के ऊस हा गुळ व खांडसरीसाठी वापरला जातो. वैशिष्ट्यपूर्ण दर्जा, चव, रंग व रवाळपणा या गुणवत्तेचा गूळ तयार करण्यासाठी पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची असते. ऊस काढणीपासून ते रस उकळण्यापर्यंत प्रत्येक टप्पा गुळाच्या गुणवत्तेवर परिणाम करत असतो. गुऱ्हाळ सुरू करण्यापूर्वी वेगवेगळ्या टप्प्यासाठी अगोदरच तयारी केल्यास निश्चितपणे दर्जेदार गूळ तयार करण्यास मदत होते. तसेच खर्चात बचत होऊन उत्पादनात सुद्धा सातत्य राहते. योग्य पद्धतीने तयार केलेल्या गुळाला बाजारात चांगली किंमत मिळते, असे मत कोल्हापुरातील प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्रातील अखिल भारतीय समन्वित काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संशोधन प्रकल्पातील डॉ. दीपक सावळे, डॉ. गोविंद येनगे, डॉ. विद्यासागर गेडाम यांनी व्यक्त केले आहे.
गुळ निर्मितीवेळी शिफारस केलेल्या ऊस वाणांची लागवडीसाठी निवड करावी. गुळ व काकवीसाठी लवकर पक्क होणारे वाण को ९२००५, को ८०१४ (महालक्ष्मी) व को ६७१ (वसंत) तसेच मध्यम उशिरा ते उशिरा पक्क होणारे वाण : ८६०३२ (निरा) व को. ९४०१२ (फुले सावित्री) यांची शिफारस करण्यात आली आहे. गूळ बनविण्यासाठी पूर्ण पक्व झालेला साधारणपणे १२ ते १४ महिन्यांचा ऊस वापरावा. अपरिपक्व ऊस वापरल्यास गुळाची प्रत खालावते. गुळाला पाणी सुटते व त्याचा टिकाऊपणा कमी होतो. ऊस तोडणीच्या साधारणपणे पंधरा दिवस अगोदर उसाला पाणी देणे बंद करावे. यामुळे रसातील साखरेचे प्रमाण वाढते. गुऱ्हाळांमध्ये उपकाहिल व रस साठवण यंत्रणा याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
ऊस रसातील मळी काढताना नैसर्गिक वनस्पतींचा (भेंडी) वापर केल्यास गुळाला चांगला भाव मिळतो. त्यासाठी जंगली भेंडीच्या झाडाची मुळे किंवा खोड ठेचून त्याचा द्रव तयार करून ठेवावा. रसाचा सामू (पीएच) नियंत्रित करण्यासाठी आणि गूळ कडक होण्यासाठी निवळीचा चुना तयार ठेवावा. संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे, स्टेलनेस स्टीलची गाळण यंत्रणा वापरुन गुऱ्हाळघरात वापरण्यात येणाऱ्या चरख्याची स्वच्छता करावी. रसाची कढईची (काहिली) नियमित स्वच्छता राखावी. रस गाळण्यासाठी सुती कापड किंवा दुहेरी जाळीची व्यवस्था करावी. या टप्प्यावर योग्य पद्धतीने रस गाळण्यासाठी अखिल भारतीय समन्वित काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संशोधन प्रकल्पाने यांत्रिकीकृत गाळप यंत्रणा विकसित केले आहे. त्याचा वापर केल्यास रस स्वच्छ करता येतो व गुळाचा दर्जा वाढतो अशी माहितीही संशोधकांनी दिली आहे. दोन टप्पा काहिली पद्धतीचे चुल्हाण वापरल्याने वेळेची बचत होऊन उत्पादन क्षमता वाढते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
















