सातारा: एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ असताना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राज्यभर गाजलेली आंदोलने झाली. ऊसदर, वीज, पाणी, कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरलेली ही चळवळ शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनली. मात्र काळाच्या ओघात संघटनेचे तीन गट झाले आणि त्याचा परिणाम आंदोलनाच्या धारेलाही बसला. मतभेद, आरोप-प्रत्यारोप, हेवेदावे यामुळे चळवळीत दुरावा निर्माण झाला. मात्र आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील हे तिघे एकत्र आले. एकमेकांना पाहून त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आणि त्या मंतरलेल्या दिवसाच्या आठवणीत सारेच भारावून गेले.
एका गुन्ह्याच्या खटल्यातील न्यायालयातील सुनावणीसाठी मंगळवारी (ता. ६) सातारा न्यायालयात हजर राहण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी संघटनेचे सचिन नलवडे यांना फोन करून पंजाबराव पाटील का येत नाहीत, अशी विचारणा केली. त्यावर पाटील आजारी असल्याचे नलावडे यांनी सांगितले. त्यामुळे खोत यांनी कराड जवळील पाचवड फाट्यावरून थेट पंजाबराव पाटील यांचे गाव असलेल्या टाळगावला गेले.त्यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या प्रकृतीची अवस्था पाहून खोत आणि नलवडे यांना भावना आवरता आल्या नाहीत.आंदोलनाच्या काळात खांद्याला खांदा लावून लढलेले दिवस डोळ्यांसमोर उभे राहिले. पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. गेल्या दोन वर्षांपासून आजारी असलेले पाटील घरातच असले तरी त्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वास आजही तसाच ठाम होता. यानंतर खोत व नलवडे यांनी पाटील यांना गाडीत बसवून सातारा न्यायालयात आणले. तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते.
















