मुरादाबाद : अमरोहा तहसील परिसरातील फाजलपूर गावात विजेच्या तारेतून ठिणगी पडल्याने पाच शेतकऱ्यांचा सुमारे साडेबारा एकरांतील ऊसाचे पीक जळून खाक झाले. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या बंबांनी धाव घेतली. मात्र, ते पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. बुधवारी दुपारी जोरदार वारा वाहत होता, त्यामुळे अति उच्चदाबाच्या विजेच्या तारा एकमेकांवर आदळल्या. तारांच्या ठिणगीमुळे उसाच्या शेताला आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले.
अमर उजालामधील वृत्तानुसार, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. लोकांनी वीज केंद्राला फोन करून माहिती दिल्यानंतर वीज पुरवठा बंद केला. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी ट्रॅक्टर चालवून उरलेले पीक वाचवले. तसेच पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत प्रवीण कुमार, चंद्रकला, चरणसिंग, होशियार सिंग आणि राजपाल यांचा ऊस जळून खाक झाला. या परिसरातील शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारा सुमारे चाळीस वर्षे जुन्या असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. तारा बदलण्यासाठी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र आजतागायत काहीच कार्यवाही झाली नाही. आता जळालेल्या ऊसाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.















