कान्हेगाव येथे शेतावर रासायनिक व सेंद्रिय कृषी निविष्ठा तयार करण्याबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा मारोती मंदिर, खंडोबा सभागृह येथे उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत सांगली जिल्ह्यातील अभ्यासू कृषी तज्ज्ञ अंकुश पाटील यांनी अल्प खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
शेती ही केवळ उत्पन्नाचे साधन नसून एक जीवनपद्धती आहे. वाढत्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि कमी खर्चात टिकाऊ उत्पादन घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन कृषीतज्ज्ञ अंकुश पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी शेती करताना खर्च कमी करावा, उत्पादन टिकवून ठेवावे व उत्पादन खर्च घटवणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ट्वेंटीवन शुगर्सचे ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेतावरच जिवाणू खते, दहा ड्रम थिअरी, कीड व रोग व्यवस्थापनासाठी अल्प खर्चातील निविष्ठा तयार करणे अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार घरच्या घरी रासायनिक व सेंद्रिय निविष्ठा तयार करून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
मार्गदर्शन करताना अंकुश पाटील यांनी वनस्पती सूर्यप्रकाश व हरितद्रव्याच्या सहाय्याने अन्न तयार करतात, तसेच चांगल्या उत्पादनासाठी कॉपर व बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्यांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
कार्यशाळेत अमिनो ऍसिड, ह्युमिक ऍसिड, फुल्विक ऍसिड, सिलिकॉन स्टिकर, ऑर्थोसिलिसिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड, मायक्रोन्यूट्रिएंट्स, ऑरगॅनिक कार्बन, बायोझाईम यांसह बाजारात उपलब्ध युरिया, ८५ टक्के फॉस्फरिक ऍसिड व ९० टक्के पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरून १९:१९:१९, ००:५२:३४, १२:६१:००, ००:००:५० ही विद्राव्य खते तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली. प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय मोकाशे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब मोकाशे होते. प्रशिक्षणार्थी म्हणून ट्वेंटीवन शुगर्सचे विभाग प्रमुख राम कुलकर्णी, दिनेश जयस्वाल, वैजनाथ हांडे, गटप्रमुख नरवाडे, चंद्रकांत मोकाशे, दत्ता कोरडे, तानाजी मोकाशे, अनंत माने, तातेराव मोकाशे, दत्तराव मोकाशे, पांडुरंग कोरडे, राम कोरडे, हेमंत मोकाशे, हरी कोरडे, ऋतू मोकाशे, माणिक कोरडे, दिलीप मोकाशे, चंदन मोकाशे, प्रणव मोकाशे, रामचंद्र कोरडे, रामचंद्र मोकाशे, माणिक झगडे, शंकर मोकाशे, कृष्णा मोकाशे यांच्यासह बीड, लातूर व परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















