अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबरपासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केली. दिवाळी फराळ व स्नेहभेट कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना ५ वर्षासाठी १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे व कारखान्याचे अध्यक्ष आमदार काळे यांचे आभार मानले आहे.
याबाबत आमदार आशुतोष काळे म्हणाले की, काळे सहकारी साखर कारखाना परिसराचा विकासरुपी रथ आहे. सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या श्रमातून गोड साखर तयार होते. या दोन्ही घटकांचे योगदान अमूल्य असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय म्हणजे त्यांच्या निष्ठेचा, मेहनतीचा आणि समर्पणाचा सन्मान आहे. त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार, राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ या ५ वर्षाच्या कालावधीसाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. राज्य सहकारी साखर कारखाना संघाने सर्व साखर कारखान्यांनी कराराची कार्यवाही व अंमलबजावणी करणेबाबत १४ ऑक्टोबर रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्याची अंमलबजावणी आता करण्यात येत आहे.


