अहिल्यानगर : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल १७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी, दि. १६ रोजी उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. मात्र निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सद्यस्थितीत चार पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची पॅनल प्रमुखांनी घोषणा केली. जनसेवा मंडळातर्फे राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, महायुतीच्या विकास मंडळातर्फे आमदार शिवाजी कर्डिले, शेतकरी विकास मंडळातर्फे राजूभाऊ शेटे, कारखाना बचाव कृती समितीतर्फे अमृत धुमाळ यांनी पॅनल उभे करण्याची घोषणा केली. बंद पडलेल्या कारखान्यासाठी रस्सीखेच सुरु आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले की, आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तनपुरे साखर कारखाना बिनविरोधासाठी चर्चेची तयारी आहे, असे सांगितले. सभापती अरुण तनपुरे यांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चेची तयारी दाखविली. अमृत धुमाळ व राजूभाऊ शेटे यांच्याशी बोलणार आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की, बंद पडलेला कारखाना चालू व्हावा, हेच ध्येय आहे. निवडणूक बिनविरोध होणार असेल, तर प्रसंगी माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारी आहे. बुधवारी (ता. १४) सकाळी दहा वाजता कारखान्याच्या क्लब हाऊस प्रांगणात सर्व पॅनल प्रमुखांनी एकत्र यावे. बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चा करावी असे प्रयत्न आहेत.