अहिल्यानगर : अकोले तालुक्याची कामधेनू असलेला अगस्ती कारखाना कितीही अडचणीत असला तरी हंगाम सुरळीत राहील. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावणेदोन लाख मेट्रिक टन ऊस असून कार्यक्षेत्राबाहेरून दीड ते पावणेदोन लाख मेट्रिक टन ऊस मिळणे अपेक्षित आहे. प्रतिकूल परिस्थितीत यंदाचा गळीत हंगाम निर्विघ्न पूर्ण करू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भक्कम साथ असल्याने अगस्ती साखर कारखाना कधी बंद पडू देणार नाही, असा विश्वास आ. डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केला. अगस्ती कारखान्यात आ. डॉ. लहामटे यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक परबत नाईकवाडी होते.
आ. डॉ. लहामटे म्हणाले की, आज रोलर पूजन होऊन गळीत हंगामाची तयारी सुरू होत आहे, याचा आज आनंद होत आहे. कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित नव्हते. ज्येष्ठ संचालक परबत नाईकवाडी यांच्या हाती काही काळासाठी कारखान्याची सुत्रे देण्यात आली आहेत. रोलर पूजन समारंभाला ज्येष्ठ संचालक अशोक देशमुख, विकास शेटे, सुधीर शेळके, सीताराम वाकचौरे, बादशहा बोंबले, मनोज देशमुख, विक्रम नवले, सुलोचना नवले, शांताबाई वाकचौरे, प्रा. विलास नवले, बाळासाहेब नाईकवाडी, संदीप शेटे, वकील वसंत मनकर, सुरेश नवले, कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस, लेखापाल विजय सावंत, कार्यालयीन अधीक्षक विश्वास ढगे उपस्थित होते.