अहिल्यानगर : पारनेर साखर कारखान्यातील सुमारे दीडशे कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेले असल्याचा आरोप पारनेर कारखाना बचाव कृती समितीच्या सदस्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. शुक्रवारी कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी कारखान्यातील साहित्याचा पंचनामा केला. कारखाना बचाव समितीने गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातील मुद्देमाल असणाऱ्या कारखाना मशिनरीचा पंचनामा करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार तपासी अधिकाऱ्यांनी कारखाना साईटची पाहणी केली व पंचनामा केला. न्यायालयाच्या आदेशानुसार हा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी सर्व साहित्याची पाहणी केली. कारखान्यातील साहित्य जागेवर आहे किंवा नाही, याबाबत कोणतीच माहिती दिली नाही.
शुक्रवारी पोलिसांनी दोन सरकारी पंचांसमक्ष कारखान्यातील साहित्याचा पंचनामा केला आहे. याबाबत पारनेर कारखाना बचाव कृती समितीचे सदस्य ॲड. रामदास घनवट म्हणाले की, कारखान्यातील गुन्ह्यातील सुमारे दीडशे कोटींचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. कारखाना साईटवरील पेट्रोलपंप देखील गायब केला असून, त्याचा स्वतंत्र पंचनामा करण्यात आला आहे. हा मुद्देमाल जप्त करण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. तर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पारनेर कारखान्यातील साहित्याचा पंचनामा केला आहे. याबाबतचा अहवाल संबंधित यंत्रणेला सादर केला जाणार आहे.