अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्यात सन २०२५- २६ मधील ६९ व्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे यावेळी उपस्थित होते. तर संचालक पुंजाहरी शिंदे व त्यांच्या पत्नी सुवर्णा, तसेच असिस्टंट को-जनरेशन मॅनेजर सचिन पवार व त्यांच्या पत्नी शीतल यांच्या हस्ते विधिवत बॉयलरचे पूजन पार पडले. ‘अशोक’ पहिली उचल प्रतिटन तीन हजार देणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुरकुटे यांनी केली.
अध्यक्ष मुरकुटे म्हणाले की, ज्ञानेश्वर कारखान्याने सन २०२५-२६ मध्ये ऊसाला प्रतिटन रुपये तीन हजार अॅडव्हान्स जाहीर केला आहे. त्यानंतर अशोक कारखान्याच्या संचालक मंडळ बैठकीत अशोक कारखान्याने ऊसास पहिली उचल प्रतिटन रुपये तीन हजार देणार असल्याचा हा निर्णय घेण्यात आला होता. ‘अशोक’चा ऊसदर व उचलीचा दर ज्ञानेश्वर व मुळा कारखान्यांच्या बरोबरीने राहील. शेतकऱ्यांचे हित हे आमच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. संचालक मंडळ व अधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध कारभारातून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करू. उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, संचालक कोंडीराम उंडे, अशोक बँकेचे अध्यक्ष अॅड. सुभाष चौधरी, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मंजुश्री मुरकुटे, सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, हिम्मतराव धुमाळ, नीरज मुरकुटे, आदिनाथ झुराळे, विरेश गलांडे, रामभाऊ कसार आदी उपस्थित होते.