अहिल्यानगर : लोकनेते मारुतराव पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर कारखान्यचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त साखर उताऱ्यासह ऊस गाळपाचे उदिष्ट साधले जाईल. यावर्षी कारखान्याचा ऊस भाव सर्वात जास्त असेल, अशी घोषणा अध्यक्ष घुले-पाटील यांनी केली. कारखान्याने १६ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचा उच्चांक आपण केला आहे, गाळप चांगले झाले तर खर्चाची विभागणी होऊन ऊस दरही जास्त देता येतो. कारखाना परिपूर्ण झाला असून यापुढे कोणताही भांडवली खर्च नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सर्वात जास्त भाव दिला जाईल, असे ते म्हणाले.
सभेच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर माऊली व लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अॅड. देसाई देशमुख यांनी प्रास्ताविक केले. तर अनिल शेवाळे यांनी सभा नोटीसीचे वाचन केले. रामनाथ गरड यांनी नफा-तोटा पत्रके, ताळेबंदाचे वाचन केले. काशीनाथ नवले, अंकुशराव काळे, दिलीपराव मोटे, रामदास कोरडे, सुदाम आरगडे यांनी विविध प्रश्न उपस्थित करून चर्चेमध्ये सहभाग नोंदवला. आमदार विठ्ठल लंघे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, प्रा. नारायण म्हस्के, शिवाजी कोलते, बबनराव धस, भैय्या देशमुख, बाळासाहेब नवले, अजित मुरुकुटे आदी उपस्थित होते. अशोकराव मिसाळ यांनी आभार मानले.