अहिल्यानगर : ज्ञानेश्वर कारखान्याकडून उसाला ३,००० रुपये पहिली उचल देण्याची अध्यक्ष नरेंद्र घुले यांची घोषणा

अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५२व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. व्यासपीठावर ॲड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, साखर कामगार संघटनेचे सरचिटणीस नितिन पवार व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी कारखान्यात यावर्षी गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३,००० रुपये पहिली उचल देणार आहे. अंतिम ऊस दर हा साखर उताऱ्यानुसार देण्यात येईल असे जाहीर केले. कामगारांना १३ टक्के बोनस देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

याप्रसंगी संचालक बबनराव भुसारी व छाया भुसारी, सभासद पांडुरंग जमधडे व नंदा जमधडे, महेश ढोकणे व शीतल ढोकणे, राहुल बेडके व सुषमा बेडके व बॉयलर अटेंडन्ट राजेंद्र मुंगसे व चंद्रकला मुंगसे यांच्या हस्ते बॉयलरची विधीवत पूजा करण्यात आली. उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी एक नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होत असून पहिल्या दिवसापासून प्रतिदिन ९,५०० मेट्रिक टनाहून अधिक उसाचे गाळप केले जाईल असे जाहीर केले. यंदा १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले. कामगार नेते नितीन पवार यांचे भाषण झाले. दतात्रय खाटीक, बाळासाहेब नवले, राजू परसैय्या, आबासाहेब ताकटे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रवींद्र मोटे, मुख्य अभियंता राहुल पाटील आदी उपस्थित होते. काकासाहेब नरवडे यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. नारायण म्हस्के यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here