अहिल्यानगर : साखर कारखानदारांमध्ये गाळप क्षमता विस्ताराची स्पर्धा !

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या विश्वात गाळप क्षमता वाढवून कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळप करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. काही कारखाने कर्ज मिळवून गाळप क्षमता वाढवत आहेत. त्याचवेळी ऊस उपलब्ध आहे, त्याक्षेत्रात नवे खासगी कारखाने उभे राहात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत उसाची पळवापळवी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऊस लागवड क्षेत्रात आणि एकरी सरासरी उत्पादनात वाढ करणे, हा उपाय साखर कारखान्यांनी करण्याऐवजी असे मार्ग स्वीकारल्याचा फटका आगामी काळात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, बहुतांश साखर कारखाने आपली गाळप क्षमता वाढविण्यावर भर देत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अंबालिका हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खासगी साखर कारखाना आहे. त्याची गाळप क्षमता जिल्ह्यात सर्वाधिक, १७,००० मेट्रिक टन आहे. मात्र कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसल्याने अशोक कारखान्यापासून ते मराठवाड्यातील गंगापूर तालुक्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस आणला जातो.

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता दुप्पट म्हणजे दहा हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची गाळप क्षमता आठ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढली. हे दोन्ही कारखाने कार्यक्षेत्राबाहेरून बराच ऊस आणतात. आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखालील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप क्षमता सहा हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविली. विवेक कोल्हे यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने साडेपाच हजार मेट्रिक टनांपर्यंत दैनंदिन गाळप क्षमता वाढविली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखान्यांचा फायदा अन् दुबळे कारखाने आणखी दुबळे होतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here