अहिल्यानगर : ऊस शेतीमध्ये बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्राचा वापर केला आहे. त्या अनुषंगाने आता सहकारमहर्षी थोरात साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढ कार्यक्रमांतर्गत नव्याने एआय वापरासाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. या मुळे जमिनीच्या पोतानुसार आवश्यक खते, उसावरील बुरशी, कीटकनाशकांचा करावयाचा वापर याबाबतची माहिती तात्काळ शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मिळेल. शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी केले आहे.
याबाबत व्हा. चेअरमन घुले यांनी म्हटले आहे की, थोरात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी २५ शेतकऱ्यांचे समूह गट तयार केले जातील. गटनिहाय ऊस पीक प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये त्या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक सहभाग असणार आहे. ही प्रणाली पूर्व हंगाम व सुरु हंगामाकरीता राहणार आहे. भरपूर पाणी जरी असले तरी ठिबक सिंचनचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती व ऊस विभागाशी संपर्क करावा किंवा गट ऑफिसमध्ये आपली नाव नोंदणी २० जुलै २०२५ पर्यंत करावी, असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.