अहिल्यानगर : डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरळीतपणे चालण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. हा कारखाना मी चालविण्यासाठी घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र मी ती मान्य करु शकत नाही. एकरकमी तसेच शासकीय पातळीवर मदतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. शक्य ती सर्व मदत करू. याबाबतीत मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या शेतकरी भवन व उपहारगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सभापती अरुण तनपुरे यांना साथ द्या, त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे राहू असे आवाहन केले. ते म्हणाले की, साखर कारखान्यासाठी केंद्र व राज्य सरकार दोघेही मदत करतील. पण अगदीच काटकसरीने कारभार करावा लागेल. मी व आमचे संचालक कोणीही कारखान्याच्या गाड्या वापरत नाहीत. सभापती अरुण तनपुरेंच्या नेतृत्वाखालील बाजार समिती राज्यात पहिल्या दहा समित्यात आहे. तशा पद्धतीने कारभार करा. बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकार मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे. यावेळी आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, कैलास पाटील, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. केरू पानसरे, बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे, हर्ष तनपुरे, राजेंद्र नागवडे, अशोक सावंत, कपिल पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.