अहिल्यानगर : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासकीय विश्रामगृहात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शैक्षणिक सुविधा, सामाजिक सुरक्षा योजना आदींचा लाभ मिळावा, यासाठी नोंदणी शीघ्र गतीने पूर्ण करण्यात यावी. कामगारांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. कामगारांचा आरोग्य विमा व अपघात संरक्षण विमा काढण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा. यासाठी प्रस्ताव तयार करून तो सादर करावा. ऊसतोड व घरकामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करून मोहीम स्तरावर नोंदणी करण्यात यावी, असे निर्देश दिले.
डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर निधीतून ३ टक्के निधी महिला व बालकल्याण विभागासाठी राखीव असतो. या निधीचा उपयोग महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनांसाठी करावा. पीडित महिलांना मनोधैर्य योजनेतून मदत केली जाते. परंतु अत्याचार घडल्यास तातडीची मदत या निधीतून करण्यात यावी अशी सूचना केली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले आदी उपस्थित होते.