अहिल्यानगर : डॉ. तनपुरे कारखान्याचे निवडणूक रणांगण तापले आहे. तिन्ही पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी आम्हीच कारखाना सुरू करणार असल्याचे सांगत कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची भूमिका जाहीर केली. दोन दिवसांत कामगार आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत. दरम्यान, कामगारांशी चर्चेच्या मुद्यावर राजू भाऊ शेटे यांसह कारखाना बचाव कृती समितीच्या नेत्यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जनसेवा मंडळाचे प्रमुख अरुण तनपुरे यांच्यावर निशाना साधला आहे.
जनसेवा मंडळाचे प्रमुख तसेच बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे म्हणाले की, आम्ही बंद पडलेल्या तनपुरे कारखान्याचे चाक हलविण्यासाठी शिवधनुष्य उचललेले आहे. सभासद, कामगारांनी निःसंकोचपणे पाठबळ द्यावे. सत्ता मिळाल्यानंतर कारखाना सुरू करूनच दाखवू, तसेच बाजार समितीप्रमाणे पारदर्शक कामकाज करीत कामगारांचे भले करणारच असे आश्वासन दिले. बाजार समितीमार्फत पेट्रोलपंप सुरू केला आहे. जनावरांचा बाजार भरविला जाणार आहे. स्व. बाबूराव दादा यांच्या कुटुंबायांतून तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे. आगामी काळात कारखान्यावरील आर्थिक अरिष्ट दूर करणारच असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
शेतकरी विकास मंडळाच्या वतीने राजू शेटे, ॲड. भाऊसाहेब पवार, सतीश बोरुडे, नरेंद्र चव्हाण यांनी कामगारांची भेट घेतली. याप्रसंगी शेटे यांनी कामगारांशी चर्चा साधताना अरुण तनपुरे यांच्यावर हल्ला चढविला. ते राहुरी परिसरातील जयकांत शिक्रे आहेत. शहरात किंवा तालुक्यात कोठेही जमिन खरेदीसाठी तयार असलेले अरुण तनपुरे यांनी बाजार समितीमध्ये पारदर्शक कारभार केल्याचे खोटे सांगितले. बाजार समिती आमच्या ताब्यात असती तर ती १०० कोटी नफ्यात असती. तनपुरे कारखाना सुरू करण्याची धमक आमच्यात आहे. सत्ता मिळताच कारखाना सुरू करून कामगार हित जोपासणार असल्याचे शेटे यांनी सांगितले.
कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने ॲड. अजित काळे, अमृत धुमाळ, अजित कदम, आप्पासाहेब दुस, सुखदेव मुसमाडे यांसह उमेदवारांनी उपस्थिती देत अरुण तनपुरे यांच्यावर टीका साधली. प्रसाद शुगर कारखाना चालविण्यासाठी तनपुरे कारखाना बंद पाडणाऱ्यांनी आता पुळका दाखवू नये. तनपुरे सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून बचाव कृती समितीनेच न्यायालयीन लढा दिला. निवडणुकीसाठी प्रशासन विरोधात लढलो. त्यामध्ये बचाव कृती समितीला यश आले आहे. कारखान्यात सत्ता मिळताच बचाव कृती समिती कामगारांची पै ना पै अदा करणार आहेत. कारखाना सुरू करणारच असे आश्वासन बचाव कृती समितीने कामगारांना दिले.