अहिल्यानगर : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७३ पैकी ११६ अर्ज मागे घेण्यात आले. तर ५७ जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीत दोन आघाडीने पूर्ण सर्व जागेवर उमेदवार उभे केले आहेत. तर कारखाना बचाव कृती समितीच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज काढल्याने त्यांच्या आघाडीची काही गटात अनुपस्थिती आहे. काही गटात मात्र तिरंगी लढत होत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
डॉ. तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर २१ जागांसाठी १८० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत ७ अर्ज अवैध ठरल्याने १७३ अर्ज राहिले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११६ अर्ज मागे घेण्यात आले. तर प्रत्यक्षात ५७ जण निवडणूक रिंगणात उतरले. या निवडणुकीत आता जनसेवा मंडळ, शेतकरी विकास मंडळ तसेच कारखाना बचाव कृती समिती मंडळ यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे.
आमदार शिवाजीराव कर्डिले, सत्यजित कदम व भाजप समर्थक सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे कर्डिले व विखे गट निवडणुकीत कोणाला सहकार्य करणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी दि. १९ मे रोजी चिन्ह वाटप होऊन दि.३१ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. तर दि. १ जून रोजी मतमोजणी होऊन त्याचवेळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी किरण सावंत, तहसीलदार नामदेव पाटील यांनी कामकाज पाहीले.
कारखाना चालविणे एवढे सोपे नाही
आ. शिवाजी कर्डिले यांनी मुळा-प्रवरा वीज संस्था कार्यालयात उमेदवारांना एकत्रित केले. आपली माघारीची भूमिका त्यांनी सविस्तर मांडली. ज्यांनी कारखान्यावर कर्जे केली, त्यांनाच त्याची परतफेड करु द्या. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रामाणिकपणे कारखाना चालवूनही राजकीय बदनामी त्यांच्या वाट्याला आली. आपण सत्तेच्या माध्यमातून विकास कामांवर भर देऊ. कारखाना चालविणे एवढे सोपे काम राहिलेले नाही. आपल्या संचालकांना अडचणीत आणण्याचा माझा विचार नाही. म्हणून आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत, असे कर्डिले यांनी स्पष्ट केले.