अहिल्यानगर : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी शासन, साखर संघ, आयुक्त कार्यालय व कोल्हे कारखाना यांच्या सहकार्याने शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कारखान्याने सामाजिक बांधिलकी टिकवली आहे असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी यांनी केले. कारखाना कार्यस्थळावर साखर शाळा सुरू करण्यात आली आहे. कारखान्याच्यावतीने या मुलांना वही, पेन, पाटी पेन्सील, खोडरबर आदी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी चौधरी बोलत होते.
कारखान्यावर अनेक जिल्ह्यातून उसतोडणी कामगार आले असून त्यांच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे या उद्देशाने ही साखरशाळा सुरू करण्यात आली आहे. या साखर शाळेमध्ये सहजानंदनगर जिल्हा परिषद शाळा व स्टेशन रोड शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र हरेकल, आशा गवळी हे सहकारी उपशिक्षकांना दररोजच्या शिकवण कामाची विभागणी करतात. शिक्षक प्रदिप साळवे व त्यांचे सहकारी त्यांच्या दैनंदिन शाळेच्या कामकाजाव्यतिरिक्त स्तरनिश्चिती चाचणी करून दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत उसतोडणी कामगारांच्या मुला-मुलींना त्यांच्या इयत्तेनुसार अभ्यास घेतात अशी माहिती यावेळी देण्यात आली. साहित्य वाटप कार्यक्रमात उप शेती अधिकारी सी. एन. वल्टे यांनी सूत्रसंचालन केले.

















