अहिल्यानगर : जुन्या पिढीचा त्याग व कष्टातून नावारूपास आलेल्या राहुरी कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळावे, यासाठी निवडणूक टाळावी. सभासद, कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रयत्नशील व जागृत रहावे, असे आवाहन महंत उध्दव महाराज मंडलिक यांनी केले. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावर संतकवी महिपती महाराज फिरता ५९ वा नारळी सप्ताह व कीर्तन महोत्सवात उध्दव महाराज बोलत होते. गणेगाव येथील वेदांताचार्य संजय महाराज खाचने, महंत अर्जुन महाराज तनपुरे, सुनील महाराज पारे, बाबा महाराज, जाधव महाराज, आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले, किशोर घावटे, अशोक शिरसाठ, संतसेवक डॉ. संदीप मुसमाडे, किशोर वरघुडे, सचीन दूस उपस्थित होते.
अवघा तो शकून। हृदयी देवाचे चिंतन ।। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर प्रस्तावना देताना उध्दव महाराज यांनी जनसामान्यांच्या मनातील प्रश्न अभंगाला जुळून आल्याचे म्हणत विचार भक्तीचा जुळला की नक्कीच चांगले कार्य घडते, असे सांगताना सावली देणाऱ्या झाडाच्या खूप फांद्या तोडल्याने वैभवाचे रुपांतर उदासिनतामध्ये झाल्याचे सांगितले. राहुरी कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी सर्व राजकीय पक्ष व लढवय्यांनी कामगार, सभासद व जुन्या पिढीच्या मनातील आवाज समजून घेत निवडणूक बिनविरोध करावी. असे म्हणताच भक्तांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रमेश नालकर यांनी संत पूजन केले. माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.
बंद पडलेल्या कारखान्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, दोन दिवसांत १२८ अर्ज विक्री
गेल्या तीन हंगामापासून बंद पडलेल्या डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप व मित्रपक्षांकडून आ. शिवाजी कर्डिले, शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून राजूभाऊ शेटे आणि कारखाना बचाव कृती समितीच्या सदस्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वामध्ये तनपुरे गटानेही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. कारखान्यासाठी गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल १२८ जणांनी अर्ज खरेदी केले आहेत. विविध ११ गटांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज खरेदी केले आहेत.
तनपुरे कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आहे. सन २०१६ च्या दरम्यान, सभासदांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काळात परिवर्तन मंडळाला एकहाती सत्ता दिली. मात्र संचालक मंडळाला कारखाना सुरळीत चालविण्यात अपयश आले. तीन हंगामांपासून कारखाना बंद पडल्यानंतर जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्ती आणली. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा सभासद, कामगारांची आहे. मात्र, आता तनपुरे गटानेही निवडणुकीत उतरण्याची भूमिका घेतली आहे.
















