अहिल्यानगर : शेवगाव येथे केदारेश्वर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रश्नी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

अहिल्यानगर : बोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखान्याने आठ महिने उलटूनही त्याचे पेमेंट न दिल्याने कर्जबाजारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर शेवगाव-नगर रस्ता अडवून धरला. साखर कारखाना व तालुका प्रशासकांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ५) तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले.

साखर कारखान्याने ऊसाचे पेमेंट अदा केलेले नाही. याबाबत शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वारंवार कारखाना प्रशासन, तहसलीदार, साखर आयुक्तांना भेटून पाठपुरावा केला आहे. मात्र, काहीच झाले नसल्याचे सांगण्यात आले. रास्ता रोको आंदोलनावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, माउली मुळे, चंद्रकांत झारगड यांनी कारखाना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र शब्दात टीका केली. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे, शरद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे आदींनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिल अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट अदा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here