पुणे : श्रीगोंदा कारखान्याचे संचालक संदीप औटी, वसंतराव गिरमकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ११० शेतकऱ्यांना ऊसशेतीत होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती घेण्यासाठी खास सहल आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत शेतकऱ्यांनी मळद येथे कमी खर्चात उसाचे अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेतीचे धडे घेतले. प्रयोगशील शेतकरी, कृषिभूषण प्रल्हाद वरे यांच्या शेतातील ऊसपिकाला त्यांनी भेट दिली. यावेळी वरे यांनी कमी खर्चातील ऊस शेतीची माहिती दिली. शेतमालाचे दर स्थिर नाहीत, खर्च मात्र वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय आणि विषमुक्त निविष्ठांचा वापर करून घरच्या घरी खते व औषधे तयार करण्याची गरज आहे.
प्रल्हाद वरे म्हणाले कि, ऊस मशागत आणि मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण औजारांचा, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर केला पाहिजे. मशागतीसाठी तीनवेळा एक एकर उसात वापरलेल्या औजारांचा एकूण वैयक्तिक खर्च फक्त १,९०० रुपये एवढाच येत आहे, असे ते म्हणाले. महा ऑर्गेनिक अँड रेश्युड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन व किरण गोडसे (वरे) सोशल फाउंडेशनच्यावतीने राज्यातील ५० शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे प्रशिक्षण दिले आहे. सन २०२२ मध्ये स्पर्धेतील अनुभव घेऊन शेतकरी कृषिभूषण प्रल्हाद वरे, हनुमंत वरे, संजय साळुंखे, मोहन परकाळे आणि संगीता वरे यांनी त्याच पद्धतीने खते, औषधे, फवारणी, ड्रिचिंग व पाण्याचे योग्य नियोजन करून उसाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. यंदाही त्याच पद्धतीने ऊस पीक घेण्यात आले. याप्रसंगी दिगंबर मोहोळकर, आनंदराव वाघमारे, मोहन परकाळे, अनिल गाडे, बापूसो वरे व अजिंक्य वरे, सिद्धार्थ तावरे, प्रथमेश वरे व आर्यन वरे आदी शेतकरी उपस्थित होते.

















