अहिल्यानगर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वीकारली धुरा

अहिल्यानगर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले. गावोगावी फिरून सभासदांशी संवाद साधला. विरोधकांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असतानाही, थोरात ठामपणे आपली वेगळी रणनीती आखून उभे राहिले. त्यातून कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असून पांडुरंग घुले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने धोरात सातत्याने कार्यकर्त्यांना एकजूट होण्याचे आवाहन ते करीत आहेत. ‘मतभेद बाजूला ठेवा, आता एकत्र या पदासाठी लढायचे असेल, तर संघटन हवे,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी कार्यकत्यांना एकजुटीचा संदेश दिला आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी १९९५ साली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले होते. तब्बल पंचवीस वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. थोरात यांनी सहकारातून संघटन बळकट करत स्नेहसंवाद मेळावे घेतले. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. सहकार टिकविण्याचे महत्त्व पटवून दिले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारधारेवर चालत बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मोजक्या संस्था टिकवून ठेवल्या आहेत. मोठा प्रशासकीय अनुभव त्यांना यासाठी कामी आल्याचे म्हटले जाते. राजकीय क्षेत्रात महसूल, शिक्षण, कृषी, पाटबंधारे यांसारखी महत्वाची खाती त्यांनी जबाबदारीने सांभाळली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here