अहिल्यानगर : गणेश कारखाना यंदा ४ लाख मे. टनाहून अधिक ऊस गाळप करणार

अहिल्यानगर : गणेश सहकारी साखर कारखान्याने येत्या हंगामात चार लाख मेट्रिक टनांहून अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. कारखान्याच्या आगामी हंगामासाठीच्या रोलरचे पूजन कोल्हे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. शेती विभागाच्या माध्यमातून ३ लाख ६० हजार मेट्रिक टन उसाच्या नोंदी कारखान्याकडे झाल्या आहेत. अतिरिक्त ऊस उपलब्ध करून हंगाम चार लाख मेट्रिक टनांच्या पुढे नेता येईल. किमान १२० दिवसांत ३ लाख ६० हजार ते ४ लाख मेट्रिक टन गाळप आपल्याला करायचे आहे. यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली आहे. त्यामुळे चालू वर्षी कारखाना हंगाम जोमाने पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोल्हे यांनी मठाधिपती महंत रामगिरी महाराज व उपासनी महाराज संस्थानच्या कन्यावृंदांच्या हस्ते आपण मोळीचा कार्यक्रम घेणार आहोत. यापूर्वीचे दोन हंगाम चांगले गेले. या हंगामासाठीही चांगली साथ द्यावी, असे आवाहन केले. गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे, सचिव नितीन भोसले, ज्येष्ठ संचालक नारायणराव कार्ले, माजी उपाध्यक्ष शिवाजी लहारे, संचालक बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, नानासाहेब नळे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सचिव नितीन भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अनिल गाढवे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here