अहिल्यानगर : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना एडीसीसी बँकेच्या कर्जाच्या चक्रव्यूहात अडकला. सरफेसी कायद्यान्वये कारवाई करून बँकेने कारखान्याचा ताबा घेतला. त्यानंतर कारखाना बंद पडला. शासनाने कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली. बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी चार वेळा निविदा प्रक्रिया केली. परंतु ती फोल ठरली. आता अवसायनात काढण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. तशी अंतरिम नोटीस मिळाल्याचा दुजोरा कारखान्याचे शासन नियुक्त प्रशासक तथा राहुरीचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) दीपक पराये यांनी दिला आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने कारखान्याची निवडणूक प्रक्रिया होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येणे अपेक्षित होते. परंतु तसे घडले नाही. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य निवडणूक प्राधिकरणाने ३२ लाख रुपये भरण्याचे कळविले. यापैकी १० लाख रुपये कारखान्याने भरले. उर्वरित निवडणूक निधी भरणा केला नाही. त्यामुळे शासनातर्फे कारखान्यावर अवसायक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. विशेष लेखापरीक्षक वर्ग (१) डी. एन. पवार यांची अवसायक म्हणून नेमणूक झाली आहे. तसा अंतरिम आदेश कारखान्याला कळविण्यात आला आहे. त्यावर कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ यांनी विहित मुदतीत हरकत नोंदवली आहे. शासनाला कारखान्यातर्फे निवडणूक निधी २२ लाखांचा भरणा करून अवसायनाची कारवाई करू नये, अशी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे, असे तनपुरे कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ यांनी सांगितले.


















